Satara : मायणीत गुरूवारी पंधरावे युवा ग्रामीण साहित्य संमेलन

मायणी : मायणी, ता. खटाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन गुरुवार दि.२० मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. भारत पाटणकर यांची निवड करण्यात आली आहे. मायणी पंचक्रोशीतील नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते, अशी माहिती समन्वयक कवी प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी दिली. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिव सुधाकर कुबेर, उपाध्यक्ष बाळकृष्ण विभूते, इतर संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संमेलनात दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. दिनेश मोरे (बारामती) लिखित ‘सुधारकांचा सुधारक : क्रांतिबा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तर तिसऱ्या सत्रात कवी शिवाजी सातपुते (मंगसुळी) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी इंद्रजीत घुले (मंगळवेढा) हे करणार आहेत. कविसंमेलनामध्ये कवी महेश मोरे (निमसोड), किरण अहिवळे (फलटण), शाहीर नारायण कदम (धोंडेवाडी), आनंद बागल (कातरखटाव), सौ. रंजना सानप (मायणी), प्रदीपकुमार भांदिर्गे (मोराळे), सोपान शिंदे (चितळी), बाळासाहेब कांबळे (मायणी), डॉ. हेमांगिनी माने (विटा), कुंदा कांबळे-लोखंडे (मायणी), सौ. अंजली गरवारे (मायणी), प्रकाश भोंगाळे (मायणी), सौ. वंदना लिपारे (मायणी), प्रकाश शिंदे (विटा), कवयित्री आराधना गुरव (वडूज), कु. पौर्णिमा वेदपाठक, संजय धोत्रे, कु. अंजली तारळे, विजय कदम (मायणी), कु. ऐश्वर्या साळुंखे सहभागी होणार आहेत.
प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शिवशंकर माळी, डॉ. शौकतअली सय्यद, कार्यक्रमाचे संयोजन शिविमचे अध्यक्ष प्रा. डॉ. भरत जाधव करत आहेत. या संमेलनास रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





