Saswad News | सासवडची बाजारपेठ राख्यांनी सजली ; रक्षाबंधनासाठी ग्राहकांची उत्साही गर्दी..

प्रभात वृत्तसेवा
सासवड – भाऊ बहिणीच्या नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील सासवड शहराची मुख्य बाजारपेठ सणाच्या उत्साहात नटली आहे. रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठा सजून गेल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा आणि स्टॉल्सवर हाताने बनवलेल्या राख्या, कार्टून थीम राख्या, चांदीच्या राख्या, आणि ट्रेंडिंग डिझाइनच्या राख्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच महिला बचत गट, स्वयंरोजगार करणारे युवक, आणि स्थानिक उद्योजकांनी यंदा विविध आकर्षक राख्या विक्रीस ठेवून चांगला प्रतिसाद मिळवला आहे.
लहान भावांसाठी कार्टून राख्यांपासून ते मोठ्या भावासाठी पारंपरिक व धार्मिक राख्यांपर्यंत सर्व प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत.मिठाई, पूजेचे साहित्य, भेटवस्तू, साजशृंगार यांच्यासह इतर सणाचे साहित्य खरेदीसाठीही बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या उसळलेल्या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे





