Saswad News | भिवरीतील हॉटेलवर पोलिसांचा छापा ; हुक्का पार्लरचा पर्दाफाश

प्रभात वृत्तसेवा
सासवड – सासवड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 9 सप्टेंबर रोजी भिवरी येथील मेहफिल हॉटेलवर छापा टाकून अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.हॉटेलमध्ये दोन टेबलवर चार जण हुक्का ओढताना आढळून आले, तसेच काऊंटरवर हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, कोळसा आणि इतर साहित्य ठेवलेले होते.
पोलिसांनी हॉटेल मालक युवराज बाळासाहेब रोमण (वय 37, रा. पिंपळे, ता. पुरंदर) यास अटक केली. त्याने हॉटेल चालवत असल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 4500 किंमतीचे हुक्का संबंधित साहित्य जप्त केले. यामध्ये चार काचेचे हुक्का पॉट, चिलीम, हुक्का पाईप आणि विविध फ्लेवरचे तंबाखुजन्य पदार्थ यांचा समावेश होता. जप्त साहित्य पंचांसमक्ष सिलबंद करण्यात आले असून पुढील तपासासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे.





