Sarvesh Kushare History : पुण्याच्या मातीत घडलेल्या सर्वेश कुशारेने रचला नवा इतिहास! पदार्पणातच ऑलिम्पिक विजेत्यांना दाखवलं आस्मान
Sarvesh Kushare History : भारतीय उंच उडीपटू सर्वेश कुशारेने नवा इतिहास रचला असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथील आहे. २०१६ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याने पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे उच्चस्तरीय प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

Sarvesh Kushare Monaco Diamond League 2026 High Jump Podium Finish : भारतीय ॲथलेटिक्ससाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. भारताचा ३१ वर्षीय स्टार हायजम्पर सर्वेश कुशारे (Sarvesh Kushare) याने प्रतिष्ठित ‘मोनाको डायमंड लीग २०२६’ मध्ये आपल्या पदार्पणातच (Debuted) चमत्कारिक कामगिरी केली आहे. हायजम्प (उंच उडी) प्रकारात तिसरे स्थान पटकावत डायमंड लीगच्या पोडियमवर (Podium Finish) फिनिश करणारा तो भारताचा पहिलाच हायजम्पर ठरला आहे. सर्वेशने २.२६ मीटरची उंच उडी मारत हे ऐतिहासिक यश संपादन केले.
नीरज चोप्राच्या ‘स्पेशल क्लब’मध्ये मारली एन्ट्री –
या ऐतिहासिक कामगिरीसह सर्वेश कुशारे डायमंड लीगच्या इतिहासात टॉप-३ मध्ये स्थान मिळवणारा चौथा भारतीय ॲथलीट बनला आहे. यापूर्वी भालाफेकपटू नीरज चोप्रा (१३ वेळा), लांब उडीपटू मुरली श्रीशंकर (१ वेळ) आणि थाळीफेकपटू विकास गौडा (२ वेळा) यांनीच हा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे, सर्वेशने कतारचा ३ वेळचा जागतिक विजेता आणि टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मुताज एस्सा बरशिम तसेच अमेरिकेचा रौप्यपदक विजेता जुवॉन हॅरिसन यांसारख्या जगातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकून हे तिसरे स्थान मिळवले. सर्वेशने नुकताच भुवनेश्वर येथील राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये २.३१ मीटर उडी मारत तेजस्विन शंकरचा ८ वर्षे जुना (२.२९ मीटर) नॅशनल रेकॉर्ड मोडला होता.
पाचव्या प्रयत्नात गाठला ऐतिहासिक टप्पा –
💪 𝙈𝙞𝙡𝙞𝙩𝙖𝙧𝙮 𝘿𝙞𝙨𝙘𝙞𝙥𝙡𝙞𝙣𝙚, 𝙂𝙡𝙤𝙗𝙖𝙡 𝙂𝙡𝙤𝙧𝙮! 🇮🇳
Lt Gen DG Misra, GOC Uttar Bharat, congratulates Nb Sub Sarvesh Kushare of #PanchshulGunners on securing 3rd place at the Monaco Diamond League as he now sets his sights on a podium finish at the Commonwealth… pic.twitter.com/AAxpUD81v0
— Uttar Bharat (@UBArea_IA) July 11, 2026
मोनाको डायमंड लीगमध्ये सर्वेशची स्पर्धा अत्यंत रोमांचक ठरली. त्याने पहिल्या प्रयत्नात २.१२ मीटर अंतर पार केले. त्यानंतर अनुक्रमे २.१६ मीटर, २.२० मीटर आणि २.२३ मीटरचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला. अखेर आपल्या पाचव्या प्रयत्नात त्याने २.२६ मीटरची उडी मारत तिसरे स्थान पक्के केले. मात्र, सहाव्या प्रयत्नात २.२८ मीटरचे अंतर पार करण्यात त्याला अपयश आले. या स्पर्धेत युक्रेनच्या ओलेह डोरोशचुकने (२.३२ मीटर) सुवर्ण तर ब्रिटनच्या जॅक किमानीने (२.३० मीटर) रौप्यपदक जिंकले.
आता सर्वेश कुशारेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स (Rabat Commonwealth Games 2026) मधील त्याच्या पदकावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

