Sartaj Aziz Death : पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री सरताज अझीझ यांचे निधन ; पंतप्रधानांसह राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

Sartaj Aziz Death : पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री सरताज अझीझ यांचे इस्लामाबादमध्ये निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या सरकारने ट्विटरवर या संबधीची माहिती पोस्ट केली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह राष्ट्रपतींनी देखील शोक व्यक्त केला आहे.
पाकिस्तान मुस्लिम लीग-एन (पीएमएल-एन) च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना,”आम्ही जड अंतःकरणाने सरताज अझीझ यांच्या निधनाची घोषणा करत आहोत. ते एक निष्ठावान आणि मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही.” असे म्हटले आहे.
पाकिस्तान रेडिओच्या वृत्तानुसार, सरताज अझीझ पाकिस्तान सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर होते. अर्थमंत्र्यांशिवाय ते नियोजन आयोगाचे अध्यक्षही होते. त्यांच्या काळात त्यांनी स्वत:च्या कार्यक्षमतेमुळे पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे काम केले होते. त्यांच्या निधनाबद्दल पीएमएल-एनचे सरचिटणीस अहसान इक्बाल यांनी शोक व्यक्त केले. तसेच ते म्हणाले की, ते पाकिस्तान चळवळीतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. त्याच्या जाण्यानंतर पाकिस्तानला त्याची खूप आठवण येईल. याशिवाय त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला
पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान अन्वर-उल-हक कक्कर आणि राष्ट्रपती डॉ आरिफ अल्वी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून माजी अर्थमंत्री सरताज अझीझ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी सरताज अझीझ यांच्या निधनाबद्दल सांत्वन केले आणि अजीज यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.
तमगा-ए-पाकिस्तान हा पुरस्कार देण्यात आला
पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री सरताज अझीझ यांचा जन्म 1929 मध्ये मर्दान खैबर पख्तूनख्वा येथे झाला. पाकिस्तान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1990, 1993 आणि 1997 मध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय त्यांनी 1998 आणि 2013 मध्ये परराष्ट्र मंत्री आणि 2013 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांच्या कार्यासाठी आणि देशासाठी केलेल्या सेवांसाठी त्यांना तमगा-ए-पाकिस्तान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





