इंदापूरच्या काटी गावात सरपंच विपुल वाघमोडेंचा स्वच्छता मोहीमेला प्रारंभ

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील काटी गावाचे नवनिर्वाचित सरपंच विपुल वाघमोडे यांनी गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प सोडला आहे. स्वच्छतेच्या मोहिमेत स्वतः पुढाकार घेत त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गाव चकाचक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
कचरा कुंड्यांचे मोफत वाटप
सरपंच विपुल वाघमोडे यांनी माहिती देताना सांगितले की, “स्वच्छ गाव, सुंदर गाव हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील प्रत्येक कुटुंबाला छोट्या आणि मोठ्या आकाराच्या दोन कचरा कुंड्या मोफत दिल्या जाणार आहेत. यापुढे गावकऱ्यांनी कचरा रस्त्यावर किंवा अस्ताव्यस्त न टाकता कचरा कुंड्यांमध्येच टाकावा,” अशी विनंती त्यांनी केली.
पाणीपुरवठा पूर्ववत –
गावातील पाणीपुरवठ्याबाबत बोलताना वाघमोडे म्हणाले, “मागील दोन-तीन दिवसांपासून पाणीपुरवठ्याबाबत गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागला, याबद्दल मी क्षमा मागतो. ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत झाली आहे. आता सर्वांना मुबलक पाणी मिळेल.”
स्वच्छता अभियानात सहभागाचे आवाहन –
गावातील स्वच्छता अभियान जोमाने सुरू असून, यात गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन गाव सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच वाघमोडे यांनी केले. काटी ग्रामपंचायतीच्यावतीनेही गावकऱ्यांना या अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रसंगी उपसरपंच उमा यादव, ग्रामसेवक संतोष मोहिते, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच वाघमोडे यांच्या या पुढाकारामुळे काटी गाव स्वच्छतेच्या दिशेने नवा टप्पा गाठण्यास सज्ज झाले आहे.





