Sarpanch Santosh Deshmukh Murder| मास्टर माईंडला अटक झालीच पाहिजे – रोहित पवार

Sarpanch Santosh Deshmukh Murder case: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलनं करुन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचे म्हटले.
तसेच, मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. आता, यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाच्या तपासाला आता गती प्राप्त झाली असून सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले. सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. तर विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडीचे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे. सीआयडीचे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.
एसआयटी नेमून काही न्याय मिळणार नाही – रोहित पवार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी नेमून काही न्याय मिळणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. या प्रकरणात आपण कोणत्या मंत्र्याचं नाव घेत नाही तर खंडणी मागणाऱ्या आरोपी वाल्मिक कराडचे नाव घेत आहोत. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही हत्या झालीच नसती असा आरोप रोहित पवारांनी केला.
हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं गावकरी म्हणतात, मग त्याला अटक झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. आमदार रोहित पवार हे मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेले होते.
निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय… pic.twitter.com/b39n04ASD1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2024
वाल्मिक कराडला अटक करा –
आमदार रोहित पवार म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्यासोबत अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना 9 तारखेला घडली. या घटनेत अनेक मोठ्या लोकांचा हात आहे. हे सामान्य लोकांना देखील माहीत आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात पवनचक्की प्रकल्पाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात मास्टर माईंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे. त्याचे सर्व फोन कॉल्स तपासले पाहिजेत.”
“पवनचक्की प्रकल्प परिसरात 6 तारखेला वाद झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी साधी तक्रार देखील घेतली नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता खंडणीप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणात जी नावं आहेत तीच नावं ही हत्या प्रकरणात आहेत. त्यामुळे या सर्वांचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड हाच असून त्याला अटक झाली पाहिजे.”





