Pune District :बारामती येथे सरपंच संमेलन उत्साहात
Pune District : अधिक उत्पादनाच्या उद्देशाने खतांचा वाढता व असंतुलित वापर मातीच्या आरोग्यासाठी कसा घातक ठरत आहे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपायही सांगितले.

बारामती : भा.कृ.अ.प. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथे “संतुलित खत वापर जनजागृती अभियान अंतर्गत सरपंच संमेलन” दि. २६ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास सुमारे ९० सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. तसेच संस्थेचे सुमारे ७० शास्त्रज्ञ, प्रशासकीय कर्मचारी, करार कर्मचारी आणि वित्त विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविकुमार यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी होते, तर कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक महेश शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी या अभियानाचे समन्वय अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी संतुलित खत वापर जनजागृती अभियानाची माहिती दिली.
अधिक उत्पादनाच्या उद्देशाने खतांचा वाढता व असंतुलित वापर मातीच्या आरोग्यासाठी कसा घातक ठरत आहे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपायही सांगितले. रासायनिक खतांच्या आयातीमुळे देशामधून परकीय चलनाच्या स्वरूपात होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीबाबत सविस्तर माहिती मांडली.
यानंतर मृदाशास्त्र विषयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निंटू मंडल यांनी मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढीसोबत जमिनीची सुपीकताही टिकून राहते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सरपंच व शास्त्रज्ञ यांच्यात संवाद सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी विविध गावांतील दुष्काळ, खारट पाणी, क्षारयुक्त जमीन आणि खतांवरील वाढते अवलंबित्व यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. अनेकांनी आपल्या गावात नैसर्गिक शेतीविषयी असे कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली.
प्रमुख पाहुणे महेश शिंदे यांनी शेतकऱ्यांना पावसाच्या परिस्थितीनुसार पेरणी करण्याचा सल्ला दिला. किमान १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. तसेच पीक फेरपालट आणि कडधान्य पिकांचा समावेश वाढवावा, असे त्यांनी सांगितले. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
अन्नद्रव्यांच्या असमतोलामुळे उत्पादनात घट
अध्यक्षीय भाषणात डॉ. के. सामी रेड्डी यांनी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक १७ अन्नद्रव्यांचे महत्त्व स्पष्ट केले. अन्नद्रव्यांचा असमतोल उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरतो, असे त्यांनी सांगितले. हिरवळीचे खत, मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खत वापर, पीक फेरपालट, जैवखतांचा वापर आणि जीवामृत, घनजीवामृत, मल्चिंग यांसारख्या नैसर्गिक शेती तंत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी संस्थेचे शास्त्रज्ञ नेहमी मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहतील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संग्राम चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. मोरगाव परिसरातील पावसाळी भागात बारमाही चारा प्रणाली व नैसर्गिक शेती प्रकल्प राबविण्यात येत असून त्याचा सुमारे १५० शेतकऱ्यांना लाभहोत असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमानंतर सहभागींसाठी प्रात्यक्षिके व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत सुरू असलेल्या विविध प्रयोगांची माहिती उपस्थित सरपंचांनी घेतली. कमी पाण्यामध्ये शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती तसेच विविध फळपिकांवरील प्रयोगांची त्यांनी पाहणी केली. आपल्या गावांमध्येही अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Pune District : बेल्हे प्रादेशिक नळ पाणी योजनेला मिळणार गती





