Satara : चोरी करणाऱ्या महिलांना सरपंचांनी रंगेहात पकडले

कोरेगाव : तालुक्याच्या उत्तर भागाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबवडे संमत वाघोली येथील श्रीराम चौकामध्ये गुरुवारी भरलेल्या आठवडा बाजारात चोरी करणाऱ्या महिला व युवतीला सरपंचांनी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
बाजारकरू व्यापाऱ्यांनी कडक शब्दात या महिलांना समज देऊन सोडून दिले. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आणि आले पिकाची खंदणी सुरू असल्याने महाराष्ट्रासह परराज्यातील मजूर कामानिमित्त कोरेगाव तालुक्यात आले आहेत.
त्यामुळे आठवडा बाजार हाउसफुल असतात. श्रीराम चौकातील बाजार मोठ्या प्रमाणावर भरला होता. सायंकाळी गर्दी वाढल्यानंतर काही महिला वयोवृद्ध महिलांना बरोबर घेऊन चोरीचे प्रकार करत असल्याचे सरपंचांच्या निदर्शनास आले.
त्यांनी सहकाऱ्यांसमवेत या महिलांवर पाळत ठेवून त्यांना रंगेहाथ पकडले. सर्व व्यापारी एका ठिकाणी जमले. चोरीची कबुली देत यापुढे असे करणार नाही, असा शब्द महिलांनी दिला.





