भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूचा भीषण अपघात

क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा युवा फलंदाज मुशीर खान याचा भीषण अपघात झाला आहे. मुशीर खान हा टीम इंडियाचा बॅट्समन सरफराज खानचा छोटा भाऊ आहे. मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान आझमगडहून लखनौला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
या अपघातानंतर मुशीरच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे. या दुखापतीमुळे मुशीरला किमान सहा ते सात महिने टीम बाहेर राहावं लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या कारने चार ते पाच वेळा पलटी घेतल्याने मुशीर आणि त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. मुशीर आणि त्याचे वडील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुशीरने रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने भारत अ विरुद्ध भारत ब संघाच्या विजयात १८१ धावा केल्या. १९ वर्षीय मुशीरची प्रथम श्रेणीत सरासरी ५१.१४ आहे. त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. मुशीरची इराणी चषक २०२४ साठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात निवड झाली होती.





