Sardar Raghuji Bhosale : सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ताब्यात; 18 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार

मुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. ही तलवार सोमवारी, १८ ऑगस्टला मुंबईत दाखल होणार आहे.
ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त २८ एप्रिल २०२५ रोजी अचानक येऊन महाराष्ट्रात धडकली. आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन केले. दूतावासात संपर्क करुन स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आशिष शेलार यांनी तातडीने मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाचा सहभाग नोंदवला आणि तो लिलाव जिंकला.
याबाबत आशिष शेलार म्हणाले, तमाम महाराष्ट्राला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थाने हा लिलाव जिंकला, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशाप्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. ही तलवार त्याब्यात घेताना लंडनमधील मराठी नागरिकही मोठया संख्येने उपस्थित होते.





