Pune News : श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम; हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
Pune News : श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नवरात्र उत्सव २०२६ निमित्त आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात आराध्य लांडे, तर आठवी ते दहावी गटात सई लांडगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Pune News : श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नवरात्र उत्सव २०२६ निमित्त आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात आराध्य लांडे, तर आठवी ते दहावी गटात सई लांडगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष विभागात सार्थक सिंग याने प्रथम, तर अंश परचे याने द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली, तर दोन विद्यार्थ्यांचा विशेष पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. (Pune News)
सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, स्वप्ना गोरे, मंदिराचे विश्वस्त भरत अग्रवाल, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी आणि प्रवीण चोरबेले उपस्थित होते. मंदिराचे संस्थापक, प्रमुख विश्वस्त राजकुमार अग्रवाल व प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. (Pune News)
‘प्राणी बोलू शकले तर’, ‘भिंती नसलेले ग्रंथालय’ आणि ‘जगाशी कनेक्टेड, आयुष्यापासून डिस्कनेक्टेड’ हे तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. अनंत डेरे आणि निताली हरगुडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. इयत्ता पाचवी ते सातवी गटात अभिनव विद्यालयाच्या आराध्य लांडे याने प्रथम क्रमांक मिळवला. जी. आर. पालकर प्राथमिक शाळेच्या कार्तिक पाटील याने द्वितीय, तर विस्डम वर्ल्ड स्कूल, वाकडच्या रिद्धी साहू हिने तृतीय क्रमांक पटकावला. (Pune News)
इयत्ता आठवी ते दहावी गटात ज्ञानेश विद्यालयाच्या सई लांडगे हिने प्रथम क्रमांक मिळवला. सेंट मिराज विद्यालयाच्या सानुजा पाटील हिने द्वितीय, तर ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या समृद्धी बारटक्के हिने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष विभागात सार्थक सिंग याने प्रथम, तर अंश परचे याने द्वितीय क्रमांक मिळवला. (Pune News)
या स्पर्धेत विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी; युनिव्हर्सल विस्डम स्कूल, बालेवाडी; विस्डम वर्ल्ड स्कूल, वाकड व हडपसर; महेश विद्यालय, कर्वे रोड आणि मॉडेल स्कूल, शिवाजीनगर या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. (Pune News)

