पुणे : हातगाडी लावण्यावरुन सराईतांचा राडा

दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन खूनाचा प्रयत्न
पुणे – परिसरात हातगाडी लावण्यावरुन तलवार व पालघण सारख्या धारदार शस्त्राने दोघांवर वार करण्यात आले. ही घटना येरवडा येथील मच्छी मार्केट येथे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये दोघा सराईतांचा समावेश आहे.
सहायक पोलिस निरीक्षक ननावरे यांनी दिलेल्या माहितीनूसार अल्बर्ट पिटर रेड्डी(29,रा.शेलार चाळ, मच्छा मार्केट,येरवडा) याने फिर्याद दिली आहे. त्यानूसार जय सुनिल ऍन्थोनी, अनिकेत जगन्नाथ काकडे(24), पिट्या कुसाळकर(28,सर्वरा. शेलार चाळ, येरवडा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जय आणी अनिकेत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुद्द बॉडी ऑफेंन्स दाखल आहेत. घटनेनंतर जय ऍन्थोनीला अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपी हे फिर्यादी अल्बर्ट याच्या तोंडओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये मच्छा मार्केट येथे हातगाडी लावण्यावरुन वाद झाले होते. या वादातून जयने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी अल्बर्ट याच्या हातगाडीवर काम करणाऱ्या अक्षय व तुषार यांना मारहाण केली. यातील तुषारच्या डोक्यात तलवारीने वार केले.
घटनास्थळावरुन अल्बर्ट पळून जात असताना आरोपींनी आरडा -ओरडा करत त्याचा पाठलाग केला. यानंतर त्याला थोड्याच अंतरावर गाठत पाठीवर आणी डोक्यावर शस्त्राचे वार केले. दोघाही जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ननावरे करत आहेत.




