‘सप्तशृंगी गडा’वर मुसळधार, भाविकांची एकच धावपळ

NASHIK । गेल्या दोन ते दिन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशकातील दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपले. दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पाणी साचल्याचे दिसून आले. पहिल्याच पावसाने दिंडोरीत पूर सदृश्यस्थिती पाहायला मिळाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी सुखावला आहे. तासाभराच्या पावसाने दिंडोरीत 1.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर आज सप्तशृंगी गडावर जोरदार पावसाने हजेरी लावली.
मिळलेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी गड येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. त्यातच गडाच्या पहिल्या पायरीच्या पायथ्याशी असलेली ड्रेनेज पाईपलाईन बंद झाल्याने परिसरातील दुकाने पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यातील विविध भागात पावसाचा येलो अलर्ट
येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल.





