बंगळुरूमध्ये स्वाईन फ्लूची साथ!

बंगळुरू : सॅप या महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या अंतर्गत आदेशात कंपनीच्या बंगळुरूमधील कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या बंगळुरूतील इकोवर्ल्ड कार्यालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची एच1एन1 विषाणूंची बाधा झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कंपनीने त्यांचे कार्यालय 20 ते 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवले आहे.
इकोवर्ल्ड बिझनेस पार्कमधील कार्यालयातील सहाव्या आणि दहाव्या मजल्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. याबाबत सॅपच्या कार्यालयाशी माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांचे दोन कर्मचारी स्वाईन फ्लूने बाधीत असल्याचे मान्य केले.
सॅप इंडियाचे दोन कर्मचारी एच1एन1 विषाणूंनी बाधीत असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाली आहे का याची तपासणी सुरू आहे. आमचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कंपनीच्या बंगलोर, मुंबई आणि गुरगावमधील व्यापक निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी घरीच बसून काम करावे, असे कंपनीच्या आदेशात म्हटले आहे.



