संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवलंय; मनोज जरांगेंच्या आरोपाने खळबळ

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. तसेच राजकीय नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचे नाव या प्रकरणात सतत समोर येत आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.
तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. संतोष देशमुख यांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडे यांनी लपवून ठेवलं आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, तपास तर सुरू आहे आता नुसते धरू म्हणतात. अजूनही आरोपी सापडलेले नाहीत. एक तर पळून गेला आहे का? धनंजय मुंडेनी लपवला आहे. तसेच या प्रकरणातील दुसरा मोबाईल सापडायला तयार नाही, तो धनंजय मुंडेकडे मोबाईल देऊन गेला की काय? अजून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली नाही.
जे आरोपी खुनात आणि खंडणीत अटक करायला पाहिजे होते ते केले नाही. खंडणीतल्या आरोपीला आयसीयूमध्ये आणले जाते. मग महादेव गीतेबद्दल सरकारला आणि धनंजय मुंडेला काय वाटत नाही का? तुम्ही बाकीच्यांना सहआरोपी का करत नाही? असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला.
सुरेश धस यांना आनंद झालाय का?
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करून सुरेश धस यांना आनंद झालाय का? मराठा आंदोलकांना नोटीसा द्यायच्या आणि पाहुणेरावळ्यांच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणीच सत्ता स्थापन करू शकत नाही. मला किती एकटा पाडायचा प्रयत्न कर देवेंद्र फडणवीस मी थांबत नसतो, असा इशाराच त्यांनी दिला.
…तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही.
तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा इशाराच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.



