Santosh Deshmukh : “पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा…”; संतोष देशमुखांच्या मुलीची आर्त हाक !

Santosh Deshmukh | Vaibhavi Deshmukh । बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सतत गंभीर आरोप होत आहेत. या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता उर्वरित मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारेकऱ्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच सुरु आहेत.
त्यातच आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मनोज जरांगेदेखील सहभागी झाले होते. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मोर्चेकरांची मागणी होती. संतोष भाऊला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
दरम्यान या मोर्चादरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने केलेल्या भाषणादरम्यान उपस्थित भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा अशा आर्त हाक यावेळी तिने दिली. यावेळी बोलताना वैभवी देशमुख म्हणाली की, ” आमचा आनंद हिरावून घेतला आहे. आम्ही तुमच्या पाठिंब्यामुळे हा लढा पुढे नेत आहोत.
आमच्या कुटुंबाच्या पाठिशी राहा. आमच्या पाठीमागे कायम राहा माझ्या वडिलांची छळ करून का हत्या केली,” असं सांगताना वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाले. यावेळी तिने पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा अशी आर्त हाकही दिली. यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले असल्याचं दिसून आलं.
म्हणून मनोज जरांगे यांनी भाषण नाही केलं…
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी भाषण का केले नाही? त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब आहे.
त्यामुळे त्यांना आज छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात जायचे होते. त्यांनी आम्हाला तसे कळवलेले होते. मोर्चा सुरू झाल्यापासून त्यांनी स्वतः सांगितले होते की माझी तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी बोलणार नाही. असं ते म्हणाले.





