Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं; ठाकरे गटाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, राऊतांनी घेतला जोरदार समाचार !

Sanjay Raut । Santosh Deshmukh Murder : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहात आवाज उठवला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिले. तसेच याचा घटनाक्रम सांगत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. या घटनेवरून सध्या वातावरण चांगलंच तापलं असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.
मात्र, बीडमधील सरपंच हत्याकांडा प्रकरणी धनंजय मुंडे जबाबदार, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. एवढंच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा घ्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “बीड आणि परभणीचा निषेध करण्यासाठी 29 डिसेंबरला भव्य मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिला आठवड्यात बीड आणि परभणीचा दौरा करणार आहेत.
2 किंवा 3 जानेवारीला उद्धव ठाकरे परभणी आणि बीडमध्ये जाऊन सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. बीड आणि परभणीतील एकीकडे तपास सुरू झालेला असताना या सगळ्या प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन घेणार आहेत, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.





