Santosh Deshmukh Case : “हे बाकीचे प्यादी, मुख्य आरोपी आकाच आहे…”; सुरेश धस नेमकं काय म्हणाले, पाहा….

Suresh Dhas । Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीनपैकी 2 आरोपींना पकडले आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. 25 दिवसांनी सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकालाहीपोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही.
तर याप्रकरणातील कृष्णा अंधाळे अजूनही फरार आहे. हे तिन्हही आरोपी अनेक दिवसांपासून फरार होते. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात छापेमारी करून या आरोपींना ताब्यात घेतले.
अश्यातच, संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, “यातला एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याचं नाव कृष्णा आंधळे तो पोरगा राहिला आहे आणि सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी नाही ते प्यादं आहे.
त्याच्या पाठीमागचा मुख्य आरोपी हा कोण आहे, तो शोध पोलिसांनी शोधला पाहिजे. यातला मुख्य आरोपी हा आका आहे. या प्रकरणाचा मुख्य आरोपी आका आहे. मी ज्यांचा उल्लेख आका असा करतो ते आकाच मुख्य आरोपी आहे. बाकीचे प्यादी आहेत, त्यांना सांगितलं जावा असं करा तसं करा असं ते आहे, मुख्य आरोपी हा आका आहे.
मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे, असं म्हणूनच नका. सुदर्शन घुले हा फक्त अंमलबजावणी करणारा आहे. परंतु हे जे आदेश दिलेले आहेत, खंडणीसाठी त्या कंपनीच्या साहेबांना उचलून आणा, तो हा प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे असं माझं मत आहे असेही धस यांनी म्हटलं आहे.
वाल्मीक कराड पुण्यात पोलिसांना शरण
या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा देखील फरार होता. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे व त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
दरम्यान, वाल्मीक कराडला अटक करण्यासाठी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात पोलिसांना शरण आला.





