” कराड अन् चाटेंनी महिनाभरापूर्वीच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची दिली होती धमकी” ; पत्नीने दिली सीआयडीला महत्वाची माहिती

Santosh Deshmukh Case । बीडमधील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून तपास सुरु आहे. या हत्याप्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकताच सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी महिनाभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते, असे अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कराडने देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती Santosh Deshmukh Case ।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून चर्चेत असेलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या जबाबात वाल्मिक कराड याने देशमुखांना जीवेमारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. याविषयी समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते.” असा धक्कादायक दावा अश्विनी देशमुख यांनी केला आहे.
अश्विनी देशमुख यांचा हा जबाब 3 जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीआयडीने याप्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन Santosh Deshmukh Case ।
दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या तपासाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करत मस्साजोग गावातील टॉवरवर चढून सोमवारी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील टॉवर परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र टॉवरजवळ पोलिसांचा बंदोबस्त असल्याने त्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आपले आंदोलन सुरु केले आहे. तसेच आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण खाली येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाकेंना धमकी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात टीकेची लाट उसळली होती. मात्र, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला होता. याच लक्ष्मण हाके यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून फोनवरून धमकी देण्यात आल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.





