हिंगोली : मराठवाड्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी सरकारने 231 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली आणि ती वितरितही झाली असली, तरी पीक विमा कंपनीकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे संतप्त झालेले कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगर यांनी अधिकाऱ्याला स्पष्टपणे सांगितले की, पुरामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस आणि तूर यासारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. नदीकाठच्या शेतांमधील माती वाहून गेली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. “शेतकरी संकटात आहे, त्यांच्याकडे काहीच उरले नाही. डोंगराळ भागात कापणीचे आदेश दिले गेले, पण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे तर सरसकट नुकसान झाले आहे. वरच्या शेंगा दिसत असल्या, तरी खालची पिके पाण्यात गेली आहेत,” असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना बांगर यांनी थेट धमकी देत म्हटले, “मराठवाड्यात भयानक परिस्थिती आहे. पीक विमा कंपनीने तातडीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करावी. कंपनीचे हित पाहू नका, शेतकऱ्यांचे हित पाहा. जर यात कसूर झाली, तर संतोष बांगर इतका वाईट माणूस नाही. हिंगोलीत तुमचा एकही माणूस ठेवणार नाही. तुमची कार्यालये उद्ध्वस्त करू. हातपाय सलामत ठेवायचे असतील, तर शेतकऱ्यांचा विचार करा.” कळमनुरी परिसरात नदीकाठच्या शेतकऱ्यांचे 99 टक्के नुकसान झाले असून, गोरगरीब शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. “शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला आहे. त्यांच्या हितासाठी तातडीने पावले उचला,” असा सज्जड इशारा बांगर यांनी दिला. या घटनेने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला असून, पीक विमा कंपन्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.