संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पुनर्लेखन करणारे आणि प्रमुख टाळकरी संताजी महाराज जगनाडे यांच्या श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ येथील समाधी मंदिरापासून ज्येष्ठ वैद्य सप्तमी शके 1947, बुधवार, दिनांक 18 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता पालखी आणि पादुका रथातून विठ्ठल नामाच्या गजरात हजारो वारकरी बंधू-भगिनींच्या साक्षीने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात रथापुढे सहा आणि मागे एक अशा सात दिंड्या, तसेच 5000 वारकरी बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत. सोहळ्यापुढील मानाचा अश्व हातवळण येथील भानुदास गवळी यांचा आहे, तर रथ यवत येथील प्रगतिशील शेतकरी ह.भ.प. छबनराव महादेव कुदळे यांनी पुरवला आहे. यावर्षी चिखली टाळगाव येथील पोपटराव किसनराव पिंगळे यांनी चांदीची नवीन पालखी बनवून विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केली आहे. दिनांक 18 जून 2025 रोजी सुदुंबरे येथील विठ्ठल मंदिराजवळ पालखीचा पहिला मुक्काम असेल. 19 जून 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता श्रीक्षेत्र देहू मार्गे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामागे चिंचवड स्टेशन येथील राका गॅस दुकानात मुक्काम होईल. 20 जून 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता नाशिक फाटा, खडकी मार्गे पुण्यातील भवानी पेठेतील तेली धर्मशाळा 82 येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी जाईल. पालखी सोहळ्याचे नियोजन अध्यक्ष नारायण शिरसागर, उपाध्यक्ष गंगाधर हाडके, सचिव अरविंद रत्नपारखी गुरुजी, खजिनदार मनोहर जाधव, ताराचंद देवराय, हरिभक्त परायण बाळकृष्ण वाळुंजकर, अरुण काळे, कोंडीबा दिवेकर, उल्हासराव वालझाडे, प्रदीप वाव्हळ, बाळासाहेब काळे, विश्वास डोंगरे, अप्पासाहेब शेलार, सौ. जयश्री राऊत, अनिल राऊत, राजेंद्र तेली आणि दिनेश जगनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या सोहळ्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती अरविंद रत्नपारखी गुरुजी यांनी केली आहे.