Pimpri : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूत परतला

जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता
तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी
धन्य झालों आह्मी जन्माचे
नाम घेऊ तुझे आवडीचें
देहूगाव : भक्तांच्या अंत:करणात अधिराज्य गाजवणाऱ्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखीचे सोमवारी (दि. २१) सायंकाळी साडेचार वाजता तीर्थक्षेत्र देहूत भव्य स्वागत करण्यात आले. या वर्षी संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचा ३४० वा वर्ष होता. सलग ३५ दिवसांच्या आध्यात्मिक यात्रेनंतर, तब्बल १७ वर्षांनी आळंदी येथे दुसऱ्यांदा मुक्काम करून पालखीने पुन्हा देहू नगरीत प्रवेश केला. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक, वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थ उत्साहात सहभागी झाले होते.
आळंदीहून पहाटे मार्गस्थ झालेल्या पालखीने डुडुळगाव, मोशी, कुदळवाडी, चिखली, तळवडे आदी ठिकाणी भक्तांच्या जयघोषात प्रवेश केला. रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची सजावट, हरिपाठ आणि टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील अशोक नगर, चिंचोली, झेंडे मळा, माळवाडी येथील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त स्वागत करत वारीचा आनंद लुटला. संत तुकाराम पादुका स्थान मंदिर, विठ्ठलवाडी येथे ट्रस्टच्या वतीने अभंग आरतीने स्वागत झाले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष महाराज काळोखे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, स्वप्निल काळोखे, सुनील हगवणे, जालिंदर काळोखे, सागर हगवणे, विलास काळोखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या स्वागतप्रसंगी रामचंद्र तुपे कुटुंबीयांनी भक्तिभावाने दही-भाताचा नैवेद्य अर्पण केला. महिलांनी सुवासिनी पूजन, औक्षण केले. या प्रसंगी हजारो महिला, वारकरी, वयोवृद्ध भक्त आपापल्या पद्धतीने श्रींचं स्वागत करत होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालखी रथातून उतरवून खांदेकऱ्यांनी ती खांद्यावर घेतली. हनुमान मंदिरासमोर अभंग गात गात भाविकांनी श्रींच्या पादुकांना वंदन केले. नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी चेतन कोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पालखीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.
देहूच्या श्री संत तुकाराम महाराज मंदिरात पालखी पोहोचताच चांदीची अब्दागिरी, रेशमी छत्र, गरूड टक्के, सावली घेऊन पारंपरिक पद्धतीने देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आरतीनंतर ‘‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल…’’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भजनी मंडपात मानकरी, सेवेकरी, दिंडीचालक यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. सोहळा प्रमुख ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, जालिंदर महाराज मोरे, गणेश महाराज, वैभव महाराज, विक्रमसिंह महाराज, उमेश महाराज, लक्ष्मण महाराज मोरे आणि इतर मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे मार्गावरील वाहने काही काळ थांबविण्यात आली होती. देहूरोड पोलिस स्टेशन, वाहतूक विभाग, गृहरक्षक दल, आरोग्य विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अनुशासनाने सेवा दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता वारी शांततेत पार पडली.
वारी ही केवळ एक परंपरा नसून ती श्रद्धेची, भक्तीची आणि शिस्तीची पराकाष्ठा आहे. यंदाची वारी म्हणजे अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि जनतेतील एकोपा याचे सुंदर दर्शन होते. अनेक भाविकांच्या मते, यावर्षीची वारी ही अत्यंत भावनिक आणि भक्तिपर झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे हे देहूतील भव्य पुनरागमन वारकरी संप्रदायाच्या इतिहासात एक सुवर्णक्षण ठरले. भक्ती, श्रम, सेवा आणि एकोपा यांच्या संगमातून पार पडलेल्या या सोहळ्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.





