Pune District : श्रीक्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी उत्साहात
Pune District : संकष्टी चतुर्थीनिमित्त जुन्नर येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज मुरकुटे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

ओझर : अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली. फुलांनी सजविलेली आकर्षक आरास, विधिवत अभिषेक, कीर्तन, महाआरती आणि भाविकांसाठी करण्यात आलेले खिचडी वाटप यामुळे मंदिर परिसर दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती.
संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर पहाटे पाच वाजता उघडण्यात आले. त्यानंतर श्री विघ्नहर गणपती बाप्पाचा विधिवत अभिषेक करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे यांच्यासह विश्वस्त विलास कवडे, विक्रम कवडे, संतोष कवडे, गोविंद कवडे, प्रकाश मांडे, शिल्पाताई जगदाळे, सूर्यकांत रवळे, विनायक मांडे, समीर मांडे, विनायक जाधव आणि मंगेश पोखरकर यांच्या वतीने हा धार्मिक विधी पार पडला. दिवसभर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
संकष्टी चतुर्थीनिमित्त जुन्नर येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज मुरकुटे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनातून त्यांनी भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संदेश दिला. त्यानंतर श्रींची महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडली. सायंकाळी सात वाजता कुकडी नदीतीरावर गंगा आरती करण्यात आली.
या संकष्टी चतुर्थीनिमित्त महाआरतीचा मान तुकाराम माळवदे, दीनानाथ नाईक, अनिल घरत, ज्योतीराम जाधव, अमरजीत अभंग आणि सुभाष काळे यांना मिळाला.संकष्टी चतुर्थीनिमित्त अन्नदानाची सेवा विलास मांडे आणि भास्कर देवराम मांडे यांनी केली. धार्मिक विधी, कीर्तन, महाआरती आणि अन्नदानाच्या सेवेमुळे श्री विघ्नहर गणपती मंदिरात श्रद्धा व भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.





