Sanjay Shirsat : पाटलांचा पक्षप्रवेश थांबवून दाखवा; मंत्री शिरसाटांचे उबाठा पक्षाला आव्हान

सांगली : उद्धवसेनेला मुंबई, कोकण पाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. उद्धवसेनेकडून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील हे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी देताना पाटलांचा प्रवेश थांबवून दाखवा, असे आव्हानही दिले.
सांगली लोकसभा निवडणूकीत ठाकरेंच्या शिवसेनेने अचानक चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांची कोंडी झाली. काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली. पण, खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्यासाठी आग्रही राहिले त्यानंतर विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंड केले. यामुळे सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली.
यामध्ये विशाल पाटील यांचा विजय झाला. या निवडणुकीत चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झाले. चंद्रहार पाटील यांना केवळ 60,860 मते मिळाली. त्यानंतर चंद्रहार पाटील नाराज असल्याचे सातत्याने दिसून येत होते. डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते उद्धवसेनेला रामराम करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी मी उद्धवसेनेसोबतच आहे, काही कामानिमित्त मी त्यांना भेटलो असल्याचे देखील चंद्रहार पाटील यांनी सांगितले होते.





