Sanjay Shirsat : राज ठाकरेंनी स्वतःचा व्हिडिओ बघावा; संजय शिरसाट यांनी लगावला टोला

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरु केली आहे. अशामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता आगामी निवडणुकींसाठीही एकत्र लढणार, हे आता जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा आहे.
अशामध्ये एकीकडे महाविकास आघाडीमध्ये यावरून धुसपूस सुरु असताना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी स्वतःचा व्हिडिओ बघावा, असे म्हणत टोला लगावला आहे.संजय शिरसाट म्हणाले, राज ठाकरे काल काय बोलले आणि आज काय बोलतात? याबाबत ते स्वतःच संभ्रमात आहेत. त्यांच्याच भाषणाप्रमाणे लाव रे तो व्हिडिओ असे करून पाहिले, तर त्यांनी काय म्हटले होते हे समोर येईल.
राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्येही कोणता झेंडा घेऊ हाती अशी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. ठाकरेसेनेबद्दल राज ठाकरे यांची पूर्वीची विधाने त्यांनी लाव रे तो व्हिडिओ मधून पाहावीत, असा सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिला. बाळासाहेब ठाकरेंना बडव्यांनी घेरल्यामुळे शिवसेना सोडत असल्याचे राज ठाकरे यांचे शब्द होते. पण, आता तेच त्यांच्याकडे जात आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली.




