आज नागपुरात मोठा गौप्यस्फोट करणार – संजय राऊत

मुंबई – हिवाळी अधिवेशनामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना टार्गेट केल्यानंतर खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी थेट दिल्लीतून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला तुमच्या सगळ्या फाईली तयार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर रविवारी राऊत यांनी मुंबईत एका शाखेच्या उदघाटनाला हजेरी लावली यावेळी राऊत यांनी आम्ही सोमवारी नागपुरात बरेच बॉम्ब फोडणार असल्याचा सुतोवाच केला.
संजय राऊत बोलताना म्हणाले, नागपूरमध्ये उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत.आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या, तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार असा सूचक इशारा देखील यावेळी राऊत यांनी दिला.
काय म्हणाले राऊत नेमकं यावेळी
आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला होता.
40 आमदार गेले असले तरी आता 140 आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे.
ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही.
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार.
तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही.
ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुमच्या फायली तयार आहेत.
आमचे सरकार आल्यावर तुम्हाला दया मया नाही, तुम्ही मागून खंजीर खुपसला, आम्ही पुढून खुपसू, असा घणाघात यावेळी राऊत यांनी केला.





