Hasan Mushrif : ‘आमच्या पक्षात संजय राऊतांनी नाक खुपसू नये’; आमदार फुटीच्या दाव्यावर मुश्रीफांची खोचक टीका
Hasan Mushrif : आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

Hasan Mushrif : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या राजकीय घडामोडींवर विविध पक्षांतील नेते आपापली भूमिका मांडताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता.
त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राऊतांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘आमचा एकही आमदार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत राहणार!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असं ते म्हणाले.
पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा मोठा दावाही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा, तर दुसरीकडे आमदारांच्या संभाव्य फुटीबाबत करण्यात आलेला दावा आणि त्यातच हसन मुश्रीफ यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे याविषयी विविध चर्चांना उधाण आलं आहे.





