संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यासाठी धमकीचा केला बनाव? आरोपी सुनील राऊतांचा निकटवर्तीय

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. याशिवाय त्यांचे भाऊ सुनील राऊत यांना देखील धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी धमकी देणाऱ्या मयूर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मात्र मयूर हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे म्हंटले जात आहे. तर त्याने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता, अशी माहिती समोर आली आहे .मयुर शिंदे आपल्या जवळच्या साथीदारांना हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत आणि सुनील राऊत यांचे गँगस्टर लोकांशी संबंध आहे. माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती देखील संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळील आहे. राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर? हा प्रश्न उपस्थित होतो. लोकांना मारण्याचा सुपाऱ्या देण्याचं काम संजय राऊत करत आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अशा माणसांनी राजकारणात राहू नये.”
पुढे ते म्हणाले की, “मयुर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. तो एक गँगस्टर आहे. त्याचे संजय आणि सुनील राऊतांबरोबरचे अनेक फोटो आहेत. आता न घाबरता आणि न थुकंता यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर लोक आता त्यांच्यावर थुंकतील. केवळ पोलीस संरक्षण मिळावं आणि आपला लवाजमा वाढावा यासाठी किती नाटकं करावीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत हे आहेत. ”
नेमकं काय घडले ?
संजय राऊत यांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्यावेळी त्यांना ‘सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा, अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू’, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मयूर शिंदेला अटक केली.





