इंधन दरवाढीवरून महाराष्ट्र सरकराला सुनावणाऱ्या मोदींना संजय राऊत म्हणाले…

मुंबई – राज्य सरकारांनी देशाच्या हितासाठी तेलावरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा. यापूर्वीही पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राज्यांची आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहनआढावा बैठकीमध्ये केले. यावेळी मोदींनी महाराष्ट्राला देखील सुनावलं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिउत्तर दिल आहे.
संजय राऊत म्हणाले,’काल झालेली आढावा बैठकीवर मी बोलणार नाही. ते योग्यही नाही. कालची बैठक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होती. या बैठकीत पंतप्रधान कोरोना स्थितीवर मार्गदर्शन करणार होते. मात्र त्यांनी इतर विषयांवरच तारा छेडल्या, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांचा कालचा संवाद एकतर्फी होता. बिगर भाजप शासित राज्यातील मुख्यंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त कालच्या बैठकीत केले गेले. पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठी बाण्याला जागून जे काही सांगायचं ते सांगितलं. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.’
दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीवरून चोख प्रत्युत्तर दिले.उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जाते. महाराष्ट्रातील जनतेला हे कळायला हवं म्हणून स्पष्टीकरण देत असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.
“मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरात 24 रुपये 38 पैसे केंद्राचा, तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कराचा वाटा आहे. पेट्रोल“च्या दरात 31 रुपये 58 पैसे केंद्रीय कर, तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे केवळ राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेल महागले ही वस्तुस्थिती नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.





