Sanjay Raut : मोदींना अटक होणार होती पण… ; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे आगामी पुस्तक ‘नरकातला स्वर्ग’ याचे प्रकाशन आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी 6 वा. होणार आहे. खा. संजय राऊत यांना एका जमीन प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आर्थर रोड येथील तुरुंगात तीन महिने राहावे लागले होते. तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
गुजरातमध्ये गोधरा दंगलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चौकशीचा कडेकोट ससेमिरा सुरू असताना, त्यांना केंद्रातील यूपीए सरकारपासून वाचवण्यात शरद पवारांची निर्णायक भूमिका होती, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाश्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह यांनाही वाचवले असल्याचा दावा केला आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीए सरकार होते आणि त्यांच्याविरुद्ध सीबीआयसह अनेक तपास संस्थांनी कारवाईचा मोर्चा उघडला होता. त्या काळात मोदींच्या सरकारमधील अनेक पोलिस अधिकारी तसेच तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शाह यांना अटक झाली होती. खुद्द नरेंद्र मोदी यांनाही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती असे संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.
शरद पवारांनी मोदींना वाचवलं
यावेळी केंद्र सरकारमधील तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी एका मंत्रिमंडळ बैठकीत ठाम भूमिका घेतली. “लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला अटक करून तुरुंगात डांबणं योग्य नाही,” असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. या भूमिकेला अनेक मंत्र्यांची मूक संमती मिळाल्याने, मोदी यांची अटक थांबली, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
अमित शहांना जामीन मिळवून दिला
अमित शहा यांच्यावरील खुनाच्या प्रकरणातही सीबीआयच्या एका विशेष पथकाने जामिनाला कडाडून विरोध केला होता. त्या पथकात महाराष्ट्र केडरचे एक वरिष्ठ अधिकारी होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी स्वतः शरद पवार यांची मदत मागितली आणि पवारांनीही आपल्या स्वभावानुसार हस्तक्षेप करत, अमित शहा यांना जामीन मिळवून दिला असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





