Sanjay Raut : “या माणसाला समर्थन देत आहात? त्यापेक्षा…”; अमित शाहांचा व्हिडीओ शेअर करत राऊतांचा पवार गटातील ‘या’ नेत्यांना सवाल
Sanjay Raut : अमित शाह एका भाषणादरम्यान, भ्रष्टाचाराचे थेट आरोप शरद पवार यांच्यावर करताना दिसत आहेत.

Sanjay Raut : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये म्हणजे एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
यावरून राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. याचदरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या सभेदरम्यानचा एक व्हीडिओ शेअर करत शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊतांची पोस्ट –
खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला खोचक सल्ला दिला आहे.
@supriya_sule
@Jayant_R_Patil
@Awhadspeaks
@RRPSpeaks
या माणसाला समर्थन देत आहात?
त्या पेक्षा राजकारण सोडलेलं बरं https://t.co/AbSwJ4iq6j— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2026
“या माणसाला समर्थन देत आहात? त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच ही पोस्ट संजय राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना टॅग केली आहे.
अमित शाहांनी व्हिडीओत काय म्हटले आहे?
संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. हा व्हिडीओ एका सभेतील जुन्या भाषणाचा असून, यात अमित शाह म्हणतात की, “तुम्ही भ्रष्टाचारावर बोलता? खरं तर भ्रष्टाचाराचा म्होरक्या जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत.
याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. तुम्ही माझ्यावर काय आरोप करता? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थागत करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार यांनी केलं आहे.” यावरून संजय राऊत यांनी शरद पवार गटाचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा:
Indapur : वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्यांसाठी आवाज उठवणार; कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही





