Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

मुंबई : सर्वपक्षीय शिष्टमंडळे परदेशांत जाऊन काय करणार? ती शिष्टमंडळे एकप्रकारे देशाची भूमिका मांडण्याऐवजी केंद्र सरकारच्या चुकांचे समर्थक करणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी त्या शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी केले.घाईघाईने सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याची गरज नव्हती. परदेशांत आपले राजदूत आहेत. ते त्यांचे कार्य करत आहेत.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सरकारच्या जाळ्यात अडकू नये. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा करण्याची विरोधकांची मागणी होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संघर्षविराम घडवून आणल्याचा दावा करत आहेत. ट्रम्प यांच्याशी कुठली बोलणी झाली ते समजायला हवे. मात्र, सरकार चर्चेला तयार नाही, असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
परदेशांत सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवल्याने काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होणार आहे, असा आरोपही त्यांनी केला. तो करताना त्यांनी काश्मीर मुद्दा द्विपक्षीय असल्याची भारताची ठाम भूमिका असल्याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी शिष्टमंडळांमध्ये सहभागी होण्याची उत्साहाने तयारी दर्शवली आहे. अशात राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे त्या आघाडीतील मतभिन्नताही समोर आली आहे.



