Sanjay Nirupam : ठाकरे गटाने कामराला पैसे दिले; संजय निरुपम यांचा आरोप

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत तयार केल्याने मोठे नाट्य घडले आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर कामरा विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात शिंदेसेनेचे नेते असलेल्या संजय निरूपम यांनी कामराला शिंदे यांच्यावर गाणे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पैसे दिले असल्याचा आरोप केला आहे.
गुन्हे दाखल केल्यानंतर मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी तीन समन्स बजावले असले तरी कामरा हा अद्याप चौकशीसाठी हजर झाला नाही. कामराने न्यायालयात धाव घेतल्याने त्याला न्यायलयाने तात्पुराता दिलासा दिलेला आहे.
निरुपम म्हणाले, ठाकरेसेनेसाठी ही निंदनीय बाब आहे. त्यांच्याकडे आता कार्यकर्ते राहिले नाहीत. त्यांचे विचार देखील संपले आहेत. त्यामुळे ते एका कॉमेडियनचा सहारा घेऊन राजकारण करत आहेत. मी या प्रकरणाच्या सुरवातीलाच सांगितलं होते की, कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशा प्रकारे आपत्तीजनक विधान केले. पण कुणाल कामरा जे बोलला ते तो बोलत नसून ठाकरे गटाचे लोक बोलत आहेत, असे निरुपम म्हणाले.





