संजय काकडेंकडून मेव्हण्याला हत्येची धमकी

पुणे – भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझे संबंध अनेक गुंडाशी असून, नीट रहा असे म्हणत त्यांनी मेव्हण्याला धमकावले. त्याशिवाय उषा काकडे यांनीही भावाला शिवीगाळ करीत धमकाविले आहे.
याप्रकरणी युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय आणि उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज ढमाले बांधकाम व्यावसायिक असून ते संजय काकडे यांचे मेहुणे आहेत. भागीदारीत बांधकाम व्यावसाय करीत असताना 2010 पासून युवराज यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे काकडे आणि ढमाले कुटुंबीयात वाद सुरू झाले. ऑगस्ट 2018 मध्ये युवराज संजय काकडे यांच्या रेंजहिल रस्त्यावरील घरी गेले होते.
त्यावेळी युवराजला तू आमच्यापासून वेगळा व्यवसाय सुरू केलास. खूप नावारूपाला आलास. पण आज जे काही आहेस ते माझ्या नवऱ्यामुळे आहेस. तू तुझ्या पायरीने राहा असे उषा काकडे म्हणाल्या. तर संजय काकडे यांनी मी सत्तेत असून, मी पाहिजे ते करू शकतो. जास्त शहाणा होऊ नकोस, तुला संपवायला मला वेळ लागणार नाही, असे म्हणत युवराजला धमकावले होते. त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये गणेशोत्सव असल्याने युवराज पुन्हा काकडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळीही काकडे कुटुंबीयांनी भांडण केले.
संजय म्हणाले, पैशांचा माज येऊ देऊ नको, तुला व कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल. माझी मोठ्या गुंडाशी ओळख असून त्यांच्याशी संबंध आहेत. तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू. तुला गोळ्या घालून विषयच संपवून टाकतो, असे म्हणत काकडे यांनी युवराजला शिवीगाळ केली. याप्रकरणी काही दिवसांपासून युवराजला असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे तपास करीत आहेत. याबाबत संजय काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.




