Sanjay Gaikwad : दहा महिन्यांपासून कोणताच निधी नाही; आमदार संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाहीये. काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार सध्या अडचणींतून चालले आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, लवकरच आपली परिस्थिती सुधारेल आणि राज्याचीही परिस्थिती पुर्ववत होईल, असे म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
महायुतीमध्ये काहीच आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरू असते. त्यातही अनेक शिंदेसेनेचे आमदार, नेते हे बऱ्याचदा सरकारविरोधातच असे काही विधान करतात आणि ज्यामुळे मोठे वाद निर्माण होतात. सध्या महायुतीमध्ये मानापमानाचे नाट्य रंगलेले असतानाच आमदार संजय गायकवाड महायुतीला दिलेल्या घरच्या आहेराचीच चर्चा रंगली आहे.
आमदार संजय गायकवाड एका वृत्तवाहिनीवर बोलताना केलेल्या विधानामुळे आता, नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे भाजपाचे मंत्री सर्व आमदारांना निधी दिला असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र शिंदेंचे आमदार निधी देण्यात येत नसल्याचे सांगत असल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याबाबत जेव्हा शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
छे.. छे निधीची टंचाई नाही…
यासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, सर्वच आमदारांना निधी दिला जात आहे. माझ्या विभागाचे मला विचाराल तर एसटी डेपो, एसटी स्टँड किंवा इतरही काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे आमदारांनी संबंधित वक्तव्य केलेले असले तरी, अद्याप माझ्यातरी निधीची टंचाई निदर्शनास आलेली नाही, असे सरनाईक यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आता सरकारमध्ये राहून सरकारविरोधात विधान केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





