Sanjay Gaikwad : ‘या’ दोन बायांनी टिवटिव करणं बंद करावं; घाणेरडं राजकारण करु नये, दमानियांवर संजय गायकवाडांचा घणाघात
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांवरून अंजली दमानिया यांच्यावर टीका केली आहे.

Sanjay Gaikwad : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार पलटवार केला आहे.
दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांचे भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबत कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “एकनाथ शिंदे यांच्यावर घाणेरडे आरोप करणे हे बेशरमपणाचे लक्षण आहे. या ज्या काही दोन-तीन बाया टिवटिव करतात, त्यांनी विनाकारण घाणेरडं राजकारण करु नये, त्यांनी हे थांबवावे,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, “आपला देश हा देवी-देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे. कोणीतरी एखाद्यासोबत फोटो काढला किंवा फोनवर बोलले, म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढणे योग्य नाही. भोंदूबाबाने काही गैरप्रकार केले असतील, तर ते समोर यायलाच हवेत आणि त्या कारवाईत आम्हीही सहकार्य करू.”
तसेच, “राजकीय नेत्यांवर आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये,” असा टोला लगावत त्यांनी दमानिया यांच्यावर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.





