Bhor : जिल्हा बँक निवडणूक प्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटे यांची निवड
Bhor : प्रतिनिधीच्या नावावर एकमत न झाल्याने अखेर हात वर करून मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

महुडे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या (२०२६-२०३१) पार्श्वभूमीवर, वेळवंड विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने मतदान प्रतिनिधी म्हणून माजी आमदार संग्राम थोपटे यांची निवड करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे सचिव सनी धुमाळ यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या मतदान प्रतिनिधीच्या निवडीसाठी वेळवंड विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची विशेष सभा आयोजित केली होती. सभेत प्रतिनिधी म्हणून काही संचालकांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचा आग्रह धरला, तर काही संचालकांनी विलास तुकाराम लाळे (रा. जयतपाड) यांचे नाव सुचवले. प्रतिनिधीच्या नावावर एकमत न झाल्याने अखेर हात वर करून मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोसायटीच्या एकूण १३ संचालकांनी हात वर करून आपले मत नोंदवले. यामध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या बाजूने ८, तर विलास लाळे यांच्या बाजूने ५ मते पडली. बहुमताच्या आधारे संग्राम थोपटे यांची मतदान प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याचे सचिव सनी धुमाळ यांनी घोषित केले.
या सभेस बाळू दूरकर, भैरू बाळगुडे, कमल राजीवडे, बाळू शिंदे, विठ्ठल शिंदे, पंढरीनाथ राजीवडे, शंकर खराडे, माधवराव धुमाळ, लक्ष्मण धुमाळ, सीताराम बैलकर, दत्तात्रय मोरे, विष्णू पांगुळ आणि हरिभाऊ पडवळ उपस्थित होते.





