‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंना ठाकरे चेकमेट करणार?

Sangola Vidhansabha Election : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांची चाहूल लागताच सुरु झालेल्या पक्षप्रवेशांनी आता चांगलाच वेग घेतला आहे. अशातच आज भाजप नेते राजन तेली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी उपचार घेऊन रुग्णालयातून घरी परतलेले उद्धव ठाकरे स्वतः या पक्षप्रवेशास उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊतांचा शहाजीबापूंवर निशाणा
संजय राऊत यांनी यावेळी शहाजीबापू पाटील यांचं थेट नाव घेत टीका केली, “ज्या गद्दारांना महाराष्ट्रातील झाडी आणि डोंगर दिसले नाहीत, त्यांना आता या झाडांच्या मुळाखाली गाडायचं आहे,” अशा शब्दात त्यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यासोबतच त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं की, “गद्दारांना गाडण्यासाठी मशाल घराघरांत पोहोचवा.”
हराम्यांना घालवायचं आहे… |
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देखील शहाजीबापूंना ‘गद्दार’ संबोधत त्यांच्यावर टीका केली. “मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम केला, पण आता मला काही हराम्यांना घालवायचं आहे. आज कामाला सुरुवात केली आहे. दीपक साळुंखे यांना मशाल दिली आहे, मशालीच्या चटके त्यांना कसे द्यायचे, ते त्यांनी ठरवायचं,” असं ते म्हणाले.
सांगोलेकर माझ्या बरोबर आहेत, गद्दारांना दाखवून द्या | Sangola Vidhansabha Election
सांगोला मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे सध्या आमदार आहेत. अशातच दीपक साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने सांगोल्यातून यंदाच्या विधानसभेत शिवसेना (उद्धव गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट सामना होणार आहे.
“सांगोल्याचा आमदार जरी गद्दार झाला, तरी सांगोलेकर माझ्या सोबत आहेत, हे दाखवून द्या. मी स्वतः प्रचारालाही येईन आणि विजयाच्या मेळाव्यातही उपस्थित असेन.” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दीपक साळुंखेंच्या उमेदवारीची घोषणा? | Sangola Vidhansabha Election
दीपक साळुंखे यांच्या हाती मशाल दिल्याने त्यांची उमेदवारी जवळपास जाहीर झाली आहे. अधिकृत घोषणा बाकी असली तरी, हा पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेची सांगोला विधानसभा मतदारसंघातील पुढील खेळी उलगडणारा ठरला आहे.
अशातच दीपक साळुंखे यांना पक्षामध्ये प्रवेश दिल्याने, उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंना चेकमेट करणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जाऊ लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
BJP Candidate: ‘भाजप’चा उमेदवार कसा ठरवला जातो? प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सांगितले ‘नियम’
अजित पावरांना मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश




