Snakebite : सांगलीत झोपेतच ‘घोणस’चा दंश; 50 वर्षीय महिलेचा मृत्यू, तांबवे गावावर शोककळा
Snakebite : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांबवे येथे झोपेत घोणस सापाने दंश केल्याने वंदना जाधव यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी कराडला नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

Snakebite : वाळवा तालुक्यातील तांबवे येथे विषारी सर्पदंशामुळे ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वंदना अनिल जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कुटुंबासोबत घरात झोपलेल्या असताना घोणस जातीच्या विषारी सापाने त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पती आणि मुलीला उठवून माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कराड येथे नेण्यास सुरुवात केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तांबवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मध्यरात्री घडली दुर्दैवी घटना
वंदना जाधव या कासेगाव-तांबवे रस्त्यालगत नदीकाठी असलेल्या शेतातील घरात कुटुंबासोबत राहत होत्या. शुक्रवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर त्या झोपल्या. मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असतानाच घोणस जातीच्या सापाने त्यांना दंश केला. वेदना जाणवू लागल्यानंतर त्यांना जाग आली.
सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पती अनिल जाधव आणि मुलगी अमरजा यांना उठवले. कुटुंबीयांनी वेळ न घालवता त्यांना कराड येथे उपचारासाठी नेण्याची व्यवस्था केली. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वंदना जाधव या प्रगतशील शेतकरी अनिल जाधव यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तांबवे तसेच परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः शेतातील घरांमध्ये आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक काळजी घेण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.





