Sunetra Pawar : राष्ट्रवादीत खळबळ! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
Sunetra Pawar : सांगलीत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठे बंड झाले आहे.

Sunetra Pawar : सांगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी उफाळला आहे. महापालिका गटनेत्याच्या विरोधात संताप व्यक्त करत तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. अजितदादांच्या निधनानंतर धाक राहिला नाही, मनमानी कारभार केल्याचा गंभीर आरोप थेट शहर जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष चिघळला आहे. पक्षाच्या दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटरहेडवर आले असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचे नाव घातले. या कारभारामुळे संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.
प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले. यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले.
त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. ज्या अशोक मासाळ यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली, त्यांच्यावरही जाधव यांनी निशाणा साधला. मासाळ यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता.
त्यांचा पक्षाशी कोणताही जुना किंवा थेट संबंध नाही. अशा व्यक्तीला संधी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारानंतर दिगंबर जाधव कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार दोन्ही जिल्हाध्यक्ष, नेते संजयकाका पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे करण्यात येणार आहे.





