Sangli Crime: जत तालुक्यातील महानूरवाडी येथे झालेल्या दुहेरी खुनातील मुख्य साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर यांचे कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथून अपहरण करून कर्नाटकात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दादासाहेब यमगर यांचा कर्नाटकातील मदभावी येथे एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. तसेच त्यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा देखील मिळून आल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये शेतातील सामायिक विहिरीच्या पाणी वाटपावरून यमगर भावकीतील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी एका गटाने केलेल्या हल्ल्यात विकास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासाहेब यमगर या दोघांचा निर्घृणपणे खून झाला होता. या खुनामध्ये दादासाहेब नामदेव यमगर हे मुख्य साक्षीदार होते. दरम्यान या खुनाचा खटला न्यायप्रविष्ठ असून मंगळवारी याची न्यायालयात तारीख होती. या तारखेला दादासाहेब यमगर यांचा जबाब नोंदविण्यात येणार होता. न्यायालयात जाण्यापूर्वी ते दुचाकीमध्ये पेट्रोल भरून येतो असे घरातून सांगून निघाले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण झाले होते. त्यांच्या अपहरणाची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. परंतु अपहरणानंतर 24 तासाच्या आतच कर्नाटकातील मदभावी येथे झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दादासाहेब यमगर यांचा मृतदेह मिळून आला आहे. दरम्यान दादासाहेब यमगर यांचे अपहरण करून खून झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.