Sandpapergate Controversy : उस्मान ख्वाजा अन् डेव्हिड वॉर्नरला मोठा झटका! सँडपेपरगेट वादामुळे समालोचन पॅनेलमधून हटवलं
Sandpapergate Controversy : २०१८ च्या सँडपेपरगेट वादावर उस्मान ख्वाजा यांनी केलेल्या नवीन खुलाशांनंतर, फॉक्स स्पोर्ट्सने त्याला आणि डेव्हिड वॉर्नरला पुढील काही आठवड्यांसाठी समालोचन पॅनेलमधून काढून टाकले आहे.

Sandpapergate Controversy Usman Khawaja David Warner removed commentary : ऑस्ट्रेलियाई क्रिकेटमधील २०१८ च्या कुप्रसिद्ध बॉल टॅम्परिंग वादाची आग पुन्हा एकदा भडकली आहे. केपटाऊन कसोटीतील या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या नव्या वादाचे पडसाद आता मैदानाबाहेरही उमटू लागले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी ऑस्ट्रेलियाई फलंदाज उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांना समालोचनापासून (कमेंट्री) दूर करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत हे दोघे समालोचन करणार होते, मात्र त्यांना प्रसारण संघातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ख्वाजाच्या आत्मचरित्रातील खळबळजनक दाव्याने खळबळ –
उस्मान ख्वाजाने दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या आपल्या ‘सब्र’ या आत्मचरित्रात मोठा दावा केला आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड करण्याच्या कटाची माहिती ऑस्ट्रेलियाई संघातील सर्वच खेळाडूंना होती, असे त्याने म्हटले आहे. डेव्हिड वॉर्नरनेही ख्वाजाच्या या विधानाचे समर्थन केले आहे. तत्कालीन चौकशीत केवळ स्टीव्ह स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट यांना दोषी ठरवले गेले होते, परंतु या नव्या खुलाशामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
पॅट कमिन्सच्या पाठीशी उभे राहिले क्रिकेट ऑस्ट्रेलिया –
🚨 David Warner and Usman Khawaja have reportedly been removed from Fox Cricket’s commentary team amid the Sandpapergate controversy.
Was this Fox Sports’ independent decision, or was there pressure from Cricket Australia behind the scenes?
The big question remains! https://t.co/qLqYjYDCbP
— Rajnesh Yadav (@CricN1) November 21, 2026
या वादाची झळ विद्यमान कसोटी कर्णधार पॅट कमिन्सपर्यंतही पोहोचली आहे. या कटाची कल्पना नसल्याचे कमिन्सने म्हटले होते, त्यामुळे त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी कमिन्सच्या कर्णधारपदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कसोटी कर्णधाराला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
फॉक्स स्पोर्ट्सकडून दोन्ही दिग्गजांवर मोठी कारवाई –
उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर हे ‘फॉक्स स्पोर्ट्स’च्या समालोचन पॅनेलचा भाग आहेत. सद्यस्थितीतील वादाचे गांभीर्य लक्षात घेता वाहिनीने या दोघांना पुढील काही आठवड्यांसाठी प्रसारणापासून दूर ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यांची समालोचनात पुन्हा कधी वापसी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २१ नोव्हेंबरपासून टी-२० मालिका सुरू झाली असून, त्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.





