Nagar | राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनवणे

जामखेड, (प्रतिनिधी) – युवतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी पक्षाने स्थापन केलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्षपदी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संध्याताई सोनावणे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मुंबईत ही निवड केली. पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणे व त्यांच्यात धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया संध्या सोनवणे यांनी निवडीनंतर दिली.
जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असलेल्या सोनवणे या अॅडव्होकेट आहेत.
तालुक्यातील नायगाव गावातील एका सामान्य कुटुंबातील संध्या सोनवणे यांनी याआधी २०१८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रटरी म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रशांसाठी अनेक वेळा यशस्वी आंदोलने केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून सोनवणे संघटनेत सक्रिय होत्या. त्यानंतर २०१८ साली संध्या सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली होती.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२२ मध्ये सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली.
राष्ट्रवादी फुटीनंतर जामखेड तालुक्यातून सर्वात प्रथम संध्याताई सोनवणे यांनी शरदचंद्र पवार गटाची सोडचिठी देत अजित पवार गटात प्रवेश करून चर्चेचा विषय बनल्या होत्या. अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची कामाची दखल थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड केली.





