संदीप नाईकांचा भाजपला रामराम; बाप आणि लेक वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढणार?

Sandeep Naik | भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आजच संदीप नाईक यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्याआधी संदीप नाईक यांनी पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठवला आहे.
संदीप नाईक नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचे संदीप नाईक यांचे म्हणणं आहे. तर भाजपने गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्याने नाईक कुटुंबातून दोन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.
भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पाठवला आहे. भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
——-
I have submitted my resignation from the position of BJP… pic.twitter.com/3FtG2aj5kZ
— Sandeep Naik (@isandeepgnaik) October 22, 2024
गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, संदीप नाईक यांना बेलापूर येथून अपेक्षित असलेली उमेदवारी दिलेली नाही. बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांच्या नावाची शक्यता असताना पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संदीप नाईक हे प्रचंड नाराज झाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघातून भाजपचे नेते गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर बहुचर्चित बेलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांची उमेदवारी कायम ठेवत भाजपने गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आता संदीप नाईक तुतारी हाती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हेही वाचा:





