Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग वर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडल्याने 5 ते 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील कडवंची शिवारात हा अपघात झाला. महामार्गाच्या कडेला काही महिला मजूर काम करत असताना नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिला मजूर अक्षरशः चिरडल्या गेल्या. अपघातानंतर महामार्गावर हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. काही मजुरांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी महिलांना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य सुरू केले. मात्र, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.