समीर वानखेडेंला मोठा झटका; मुंबईतील हॉटेल आणि बारचा परवाना रद्द

मुंबई – समीर वानखेडे यांना एनसीबीमधून निरोप देण्यात आला आहे. पण त्यांच्या अडचणी मात्र अजूनही संपलेल्या नाहीत. आज बुधवार रोजी महाराष्ट्रातील समीर वानखेडे यांच्या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे, ज्यामध्ये बारचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलीक यांनी वानखेडे यांच्या हॉटेलविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली आहे.
समीर वानखेडे यांचे नवी मुंबई येथे सदगुरू हॉटेल व बार नावाचे हॉटेल होते. या हॉटेलचा परवाना ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. या हॉटेलचा परवाना मिळविण्यासाठी वानखेडे यांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये बनावट कागदपत्रे आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत ठाण्याचे एसपी एक्साईज नीलेश सांगडे यांनी सांगितले की, सद्गुरू हॉटेल आणि बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. डीएमच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी डीएमने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तपासात असे आढळून आले की, वानखडेंनी परवान्यासाठी अर्ज केला तेव्हा त्याचे वय 21 वर्षांपेक्षा कमी होते. त्यामुळे सदगुरु हॉटेल अँड बारचा परवाना रद्द करण्यात येत आहे.





