‘संभाजी भिडे आमचे गुरुजी’, फडणवीसांच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले,’या नीच प्रवृत्तीच्या..’

मुंबई – महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यावेळी
संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत निवेदन देत असताना देवेंद्र फडणवीस हे सातत्याने संभाजी भिडे यांचा ‘गुरुजी’ असा उल्लेख करत होते. फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अमरावती पोलीसांनी नोटीस बजावली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनी दोन पुस्तकांतून काही मजकूर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वाचून दाखविला. ही दोन्ही पुस्तके काँग्रेस नेत्यांनी लिहिली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. कोणत्याही महापुरुषांचा अपमान हे सरकार सहन करणार नाही.असेही ते म्हणाले
यावरून आता विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मिटकरी यांनी काही वेळापूर्वी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचित केली. याच मुद्यावरून मिटकरी म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांचं वरच्या सभागृहात (विधान परिषदेत) भाषण ऐकलं. मी त्यावर हरकतही घेतली.अशा नीच प्रवृत्तीचा माणूस कोणाचा गुरू असू शकेल असं मला वाटत नाही. त्याला कोणी गुरू मानू नये.’ असेही ते म्हणाले आहे.





