Sambhaji Bhide : सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवा: संभाजी भिडे

सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात सर्वधर्म समभावाच्या संकल्पनेवर तीव्र टीका करत त्याला “नीचपणा” आणि “नपुंसकपणा” संबोधले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यासह त्यांनी यापूर्वीच्या “आंबे खाल्ल्याने मुलं होतात” या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरही आक्षेपार्ह टिप्पणी केली. या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सर्वधर्म समभावावर हल्लाबोल
सातारा येथील कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, “सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार ना धड स्त्री, ना धड पुरुष, म्हणजेच नपुंसकपणा आहे.” त्यांनी तिरंगा ध्वज आणि संविधान मान्य असल्याचे सांगितले, पण भगव्या ध्वजाला हजारो वर्षांचे देशाचे प्रतीक मानले. “15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करू, तिरंगा फडकवू, पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी आपण काम करत राहू,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
आंब्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार
भिडे यांनी यापूर्वीच्या “आंबे खाल्ल्याने मुलं होतात” या वादग्रस्त दाव्याचा पुन्हा उल्लेख केला. “मी आंब्याचे झाड लावले आहे, तुम्ही तिथे जाऊन आंबे खाऊ शकता,” असे सांगत त्यांनी या प्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा उल्लेख केला. या वक्तव्यामुळे यापूर्वीही त्यांच्यावर टीका झाली होती आणि आता पुन्हा त्याने वादाला तोंड फोडले आहे.
भिडे यांनी खग्रास ग्रहणाच्या काळात मंत्रजप केल्यास त्या मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते, असा दावा देखील केला. “शिवाजी महाराजांनी गायत्री मंत्राचे पठण थंड पाण्यात मानेपर्यंत उभे राहून केले. त्यांच्या मृत्यूवेळी शरीर खचले होते, पण त्यांनी सप्तसिंधू आणि सप्तगंगा मुक्त करण्याचा संदेश दिला,” असे भिडे म्हणाले.





