संभाजी भिडे पुन्हा वादग्रस्तच बोलले; म्हणाले,”भूतबाधा, विषबाधेवर उपाय आहे, पण देशाला गांधीबाधा…”,

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता आत्यानी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. देशातील सध्याच्या परिस्थितीवर एकमेव तोडगा म्हणजे देशातील सर्व १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. तसेच देशाला सध्या गांधी बांधा झाल्याचे म्हणत नवा वाद ओढवून घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरण लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी भूमिका मांडली. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी,”हिंदुस्थानला तीन बाधा झाल्याचं विधान केलं. “एखाद्या व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात काही कार्यक्रमात खाण्या-पिण्यात अनेकांना विषबाधा होते. या बाधांवर उपाय आहेत. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तीन बाधांवर तोडगा कोणता असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांना प्रिय असणारं कार्य पूर्ण कसं होईल? यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न करायला हवा”, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूच्या वेळचा प्रसंग संभाजी भिडे यांनी सांगितला. “शिवछत्रपतींना काय प्रिय होतं? मरणाच्या वेळी देखील हा महापुरुष आपलं कुटुंब, लेकीबाळी, सुना-नातवंड यांचा विचार करत नव्हता. ३ एप्रिल १६८० रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी शिवछत्रपतींच्या देहातून प्राण निघून गेले. त्याआधी अर्धा मिनीट सगळं बळ एकवटून अंथरुणावरचं आपलं शरीर उचलून भोवतीच्या माणसांना शिवछत्रपती म्हणाले ‘आम्ही जातो, आमचा इथला मुक्काम संपला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. सप्तसिंधू म्हणजे काय? हिमालयात उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, सिंधू सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी अशा सात नद्या”, असे भिडे यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, हिंदुस्थानला जगात लौकिक मिळवून द्यायचा असल्यास १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. “सबंध जगाचा त्राता म्हणून ताकद हिंदुस्थानला मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. सबंध हिंदुस्थानचा रक्तगट बदलायला हवा. १२३ कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे”, असे भिडे यावेळी म्हणाले.





